बालपण आनंदाचे

एकतर माझे बालपण मजेत गेले. परंतु आनंदाचे बालपण खडतर गेले. आनंद माझा मोठा भाऊ. त्याचा स्वभाव बालपणापासूनच मनंमेळावू होता. घरात त्याची फारच लुडबुड चालायची. घरातील चीजवस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या त्याला बिलकुल चालायच्या नाहीत. यावरून तो रागवायचा. परंतु हाच स्वभाव त्याला मोठेपणी उपयोगी पडला.

आनंदला खेळण्याची भारी आवड होती. शाळेतून आल्या आल्या दप्तर नेहमीच कोपऱ्यात ठेवून, प्रथम मित्रांना गोळा करून क्रिकेट खेळण्यासाठी सेंट्रल मैदान किंवा बी. जे. हायस्कूलच्या मैदानावर स्वारी गुल व्हायची. त्याचे पुष्कळ मित्र शाळेपासून ते घरापर्यंत जोडलेले होते. हेच मित्र मोठेपणी शिवसेनेचे कार्य करताना गुण्यागोविंदाने साथ देत होते.

गावदेवी मैदान शिवाजी मैदान व सेंट्रल मैदानावरील मा. बाळासाहेबांची सभा असो किंवा इतरही सभा चुकविली जात नव्हती. आवर्जून हजेरी लावायचा. अश्या ह्या सभांमुळे त्याचा सामाजिक व राजकीय अभ्यास चाले. तोही त्याला पुढे उपयुक्त ठरला. याच जोडीला शाळेतील प्रगती सुद्धा उत्तम होती.

२६ जानेवारीला सेंट्रल मैदानावरील पोलिसांच्या कावयातीही पाहण्यास आनंद अगत्याने जात असे. त्यावेळी पोलिसांच्या कोटावरील बटणांची जवळून पाहणी करत असे. भीती अशी वाटतच नव्हती. एका दिवाळीला अंघोळ केल्यावर नरकासुराचा वध करण्यासाठी लागणारी कारीटे घरात आणलेली असूनही मिळत नव्हती. तो त्याच ओलित्याने पळत पळत नाक्यावर जाऊन कारीटे घेऊन आलाच. मात्र कोणावरही रागावला नाही. कारण, दिवस सणाचा होता. आमच्या जुन्या घरात पहिल्या माळ्यावर दारापुढे मोठी मोकळी जागा होती. त्या जागी रांगोळी काढणे, आकाशकंदील बनविणे या गोष्टी हौसेने करायचा.

अगदी चक्कीवरून दळणही आणायचा. कोणाला मदत करण्यासाठी मागेपुढे न पाहता, जात असे. सोडे, सोड्याची खिचडी, ओले बोंबील, पांढरी कढी, अळू वडी हे त्याचे आवडीचे खाद्यपदार्थ हा एक विसरले, मिसळही आवडे. या मिसळीचा किस्सा, सावंत यांच्या या पुस्तकात कामलेश चव्हाण याने सांगितले आहे. अशा या मिसळीसाठी मला घुल्यांच्या ‘जानकी’ हॉटेलमध्ये आनंद पिटाळायचा मी लहान असल्याने पळत-पळत जाऊन मिसळ आणून देई. मला तो ‘आऊ’ म्हणायचा.

एका रक्षाबंधनाला मात्र मला राखी बांधण्यासाठी उशीर झाला. तर. ‘आऊ कशी नाही आली आजून ?’ अशी त्याच्याकडून विचारणा झाली.

असा हा माझा भाऊ, चुकले आपण सर्वांचाच भाऊ… माझ्या घरी आल्यावर भाच्यांच्या व भाचीच्या गराड्यात अडकत असे. त्यातून त्याची सुटका होणे कठीणच तो आल्याआल्या अराम खुर्चीत आराम घेई. जेवणापूर्वी हातातील सर्व अंगठ्या काढून हात स्वच्छ धुत असे. एका शनिवारी त्यातील एक अंगठी हरवली. शोधता-शोधता ती गाडीत मिळाली.

सर्व आठवणींचा काळ, चित्रपटाप्रमाणे डोळ्यासमोर तरळत राहून, मला आनंदची अथवा येत राहते.

सौ. अरुणा सुधीर गडकरी

मुकुंद सहनिवास, १६ ‘ गोदावरी, आनंद पार्क
(श्रीरंग सोसायटी), ठाणे (प.)