दिघे साहेब.....

बालपण

आनंद चिंतामणी दिघे यांचा जन्म २७ जानेवारी १९५२ रोजी रायगड जिल्यातील निसर्गरम्य मुरुड – जंजिरा येथे झाला. या संस्थानाच्या नवाबाच्या काळात त्यांचे पणजोबा रामचंद्र दिघे हे कारकुनी करत असत. त्यावेळी नवाबाकडे प्रामुख्याने हिंदुधर्मीय कर्मचारी वर्ग होता. यामध्ये कारकुनीची कामे मुख्य करून सीकेपी समाजाकडे होते. त्यांचे आजोबा द्वारकानाथ दिघे जंजिरा संस्थान काळात देवी डॉक्टर म्हणून नोकरीस होते. मुरुड शहरात जुन्या पॉवर हाऊस कार्यालयानजीक दिघे यांची वडीलोपार्जित जागा व थोडी बागायत आहे.

बालपणीच्या आठवणी जागृत राहाव्यात यासाठी आईच्या स्मरणार्थ या जागेत एक घर बांधण्याचा पक्का विचार झाला होता. दिघे यांच्या घराण्याला येथे ‘आपटेवाले दिघे’ या नावाने संबोधले जाई. कारण पूर्वापारपासून त्यांच्या घरासमोर एक आपट्याचे झाड होते. त्यांचे वडील श्री चिंतामणी द्वारकानाथ दिघे यांना बॉम्बे टेलीफोन मध्ये नोकरी मिळाली. आनंद दिघे यांचे काही काळ प्राथमिक शिक्षण मुरुड शाळा नं. १ मध्ये झाले होते. नंतर आनंद दिघे नऊ – दहा वर्षांचे असताना ठाण्यातील एम. एच. हायस्कूल मध्ये त्यांचे शिक्षण सुरु झाले आणि येथूनच त्यांचा ठाण्यातील प्रवास सुरु झाला.


शिवसेना प्रवेश व कार्य

तरुण वयात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी व भाषणांनी प्रेरित होऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तत्कालीन जिल्हाप्रमुख श्री. मो. दा. जोशी यांनी त्यांचा सदस्य नोंदणीचा फोर्म भरला. याची जाणीव त्यांनी कायम ठेवली. पुढे संघटनेच्या कार्यात त्यांनी हुरहुरीने भाग घेऊ लागले. तलावपाळी येथील डॉ. मूस रोड वारील शिवसेना ठाणे जिल्हा मध्यवर्ती शाखेत ते नेमाने जाऊ लागले. सुरवातीला विद्यार्थी सेनेची जबाबदारी स्वीकारली. त्याचवेळी श्री. दिलीप हाटे यांच्या बरोबर ‘दि मेरीट’ हे साप्ताहिक ते संपादित करत असत. शिवसेनेचे मोर्चे, बंद, आंदोलने, मेळावे यात ते आग्रेसर भूमिका घेत. त्यामुळे सर्वाचे त्यांच्याकडे लक्ष वेधले जाई. पुढे उपशाखा प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारून त्यांनी जणू पूर्णवेळ काम पाहू लागले.

धोबीआळीतील लाकडी जिना असलेलं पहिल्या मजल्यावरील त्यांचे छोटेखानी घर सकाळीच शिवसैनिकांचे जमण्याचे ठिकाण झाले. माजघरात एक खाट, शेजारी टेबल खुर्ची अश्या छोट्याश्या घरात गर्दी वाढू  लागल्यावर लाकडी जीना देखील भरून खाली रस्त्यावर लोकांना उभे राहावे लागे. आलेल्या शिवसैनिकांशी कामाची चर्चा, कोणाला नोकरीसाठी चिट्ठी असे कामकाज सकाळी त्यांच्या घरी चाले. नंतर मग घुले काकांच्या समाधान हॉटेलवर येत. तेथून मग दिवसभर कोर्ट- कचेरी, पोलीस स्टेशन, नगरपालिका, जिल्हाधिकारी, तहसील कार्यालय यांची कामे केली जात. जिल्ह्यातील तालुक्यातील शाखांना भेट देणे तेथील पोलीस स्टेशनची कामे करणे आदी कामासाठी सुद्धा त्यांचे जाणे- येणे दिवसभर होत असे. त्यावेळी त्यांचाकडे कोणतेही वाहन नसल्याने कोर्ट, तहसील नगरपालिका येथे पायी जाणे होई. कार्यकर्त्यांचा फौजफाटा सोबत असे. जिल्ह्यात फिरताना देखील एस.टी. किवा मिळेल त्या वाहनाने प्रवास व्हायचा, कोणाकार्यकर्त्याची स्कूटर, जीप आदी वाहने नेहमी मिळणे दुरापास्त होते. क्वचित प्रसंगी कोणाची जीप गाडी उपलब्ध होणे म्हणजे सौभाग्यच ! मात्र मिळालेल्या वाहनाने प्रवास करून जिल्हाभर कार्यकर्त्यांना भेटणे, त्यांच्या अडी-अडचणींना सोडविणे इ. कामे सुरु असत.

बेकार तरुणांना व नागरिकांना नोकऱ्यात प्राधान्य मिळावे म्हणून कंपन्यांच्या व्यवस्थापकांना भेट देत. नोकरीसाठी हवालदिल झालेल्या तरुणांना त्यामुळे मोठा दिलासा मिळे. प्रसंगी कंपन्यांवर मोर्चा काढीत. आंदोलने करीत त्यामुळे काही प्रमाणात नोकऱ्या मिळू लागल्या. काही तरुणांना ठाणे जिल्हा शिवसेना व्यावसाय मार्गदर्शन केंद्रामार्फत उद्योग-व्यवसाय सूर कण्यास मदत व सहकार्य केले. प्रसंग अतिक्रमण खात्याशी लढा दिला. त्यामुळे अनेकांना स्टॉल, पानपट्टी, चहा, वडापाव सेंटर या द्वारे उदरनिर्वाहाचे साधन मिळाले. हजारो कुटुंब त्यांनी मार्गी लावले. संध्याकाळी मध्यवर्ती शाखेत नवीन शाखा काढणे. शिवसैनिकांच्या समस्या सोडवणे, नवीन आंदोलने, मोर्चा यांची आणखी करणे आदी शिवसेनेचे कार्य चाले. हळूहळू कामाचा व्याप वाढू लागला. जिल्ह्यात शाखा मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या. ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हापारीषद, पंचायत समिती निवडणुकांत शिवसेनेने भाग घेण्यास सुरवात केल्याने कामाचा व्याप वाढू लागला.

आनंद दिघे साहेबांनी पूर्ण वेळ संघटनेसाठी दिल्याने कार्यकर्त्यांची व नागरिकांची आपली कामे करून घेण्यासाठी त्यांच्याभोवती गर्दी वाढू लागली. घरगुती भांडणापासून विरोधी गटातील भांडणे सोडवण्यासाठी पोलीस स्टेशन मधून आरोपींना सोडवण्यासाठी, कोर्टात जाऊन जामीन देणेसाठी लोक त्यांच्याकडे येऊ लागले. मध्यावर्ती शाखा व आत्ताचे आनंद आश्रम येथे काम करताना दिवसही अपुरा अपुरा पडू लागला जिल्ह्यात वाढलेल्या संघटनेचे काम करताना आलेल्या समस्या सोडवण्यासाठी लोक रात्री अपरात्री येऊ लागले. दिवस-रात्र, दिघे साहेब लोकांच्या गराड्यात असत. वसईला निघालेल्या मोर्च्यात झालेल्या लाठीहाल्यात त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याने त्यांना डॉ. पंडितांकडे ऍडमिट केले होते. त्यावेळीसुद्धा त्या हि परिस्थितीत हॉस्पिटलमध्ये लोकांचे तक्रारी सोडविण्याचे व संघटनात्मक कामे त्यांनी केलीच ! लोकांची गाऱ्हाणी ऐकणे, ती सोडवण्यासाठी झटणे, त्यासाठी तहान–भूक  विसरून कामात दंग राहणे हे जणू व्यसनच जडले होते. दिघे साहेब म्हणजे तक्रार निवारण केंद्रच बनले होते!

ठाणे जिल्हा विद्यार्थीसेनचे काम करताना, ठाणे उपप्रमुख नंतर उपजिल्हाप्रमुख म्हणून काम करताना त्यांनी त्यांच्या काळातील श्री. मो. दा. जोशी, श्री सतीश प्रधान, श्री. साबीर शेख, श्री गणेश नाईक या जिल्हाप्रमुखांबरोबर संघटनात्मक जबाबदारी पार पाडताना त्यांच्याशी आदराने संबध ठेवले. संघटनात्मक कुरबुरी त्यांनी कधीच चव्हाट्यावर येऊ दिल्या नाहीत. पुढे त्यांची ‘ठाणे जिल्हा प्रमुख’ म्हणून नियुक्ती करण्यात आली. हो नाही म्हणताना त्यांनी हि मोठी जबाबदारी स्वीकारली.

स्वच्छता, टापटीप व शिस्त या बाबत त्यांचा करडा कटाक्ष असे. बेशिस्त ते कधीही खपवून घेत नसत त्यामुळे शाखेत अथवा आनंद आश्रमात स्वच्छाता टापटीपणा कितीही गर्दी असली तरी शिस्त याचे दर्शन होत असे. स्वभाव करारी, तापट असला तरी वेळे प्रसंगी मृदू, मिश्कील ही होई. गंभीर वातावरणात हास्याची लकेरही ते आणीत. मोजकेच पण मार्मिक बोलणे. नजरेने एखाद्याचा मनाचा ठाव घेणे. एकदा परिचित झालेल्या व्यक्तीचे नावानिशी स्मरण ठेवणे. वेळेचे बंधन पाळता आले नाही तरी निमंत्रणाला उपस्थित राहण. एखाद्याच पूर्ण ऐकून त्याविषयी योग्य तो मार्ग शोधणे. लहानमुलांमध्ये खेळकर वृतीने तर वडीलधाऱ्यांचा यथोचित आदर करून वागणे. गुणीजानाचे पोटभर कौतुक करतील तर दुर्जनाच्या हात धुवून पाठी लागतील. कधी चिंताग्रस्त, विचारमग्न तर कधी प्रसन्न मूड मध्ये दिसतील, खोडी काढतील. दुसऱ्यांच्या मानतील काढून घेतील पण स्वतःच्या मनाचा थांगपत्ता लागू देणार नाहीत. असा त्यांचा स्वभाव गुण विशेष होता.