कार्य साहेबांचे.....

दिनचर्या

सकाळी ७ च्या सुमारास उठल्यावर मुखमार्जन आलेले पेपर चालणे व त्यावर टिप्पणी करणे. नंतर अंघोळ, देवपूजा, ध्यान धारणा, नंतर १०.३० च्या सुमारास आलेल्या लोकांना भेटणे, संघटनात्मक कामांविषयी आलेले फोन घेणे व करणे. बाहेर पडताना प्रत्येकाची चौकशी करणे, विचारपूस करून बाहेर पडणे हे त्यांचे नित्येचे झाले होते. दिवसभर वाढदिवस, पूजा, लग्न, जयंती-उत्सव, उदघाटने आदी कार्यक्रमांना उपस्थित राहणे. दिवसभरात आलेल्या व्यक्तींची नोंद ते करायला सांगत, त्यामुळे आलेल्यांची माहिती मिळे. त्यांच्याशी बाहेरून फोनवर संपर्क सांधणे असे दिवसभर चाले आणि रात्री पुन्हा कार्यलयात जनतेच्या तक्रारी, तंटे सोडविणे. कार्यकर्त्यांशी सल्लामसलत आदी अगदी उत्तर रात्री पर्यंत चाले.

टेंभीनाक्यावरील कार्यालयात प्रथमच साहेबांनी वास्तव्यात सुरवात केली तेव्हा त्यांनी तेथे एक फ्रेम केलेली पाटी लावलेली आजही पहावयास मिळते. त्यामध्ये ठळकपणे मजकूर आहे.

शाखा हेच माझे घर
रात्रंदिवस साथ देणारे शिवसैनिक
हेच माझे बंधू.

समस्या घेऊन येणारे नागरिक माझे आप्तेष्ट आणि त्यांची समस्यांची सोडवणूक हेच माझे ऐश्वर्य !

त्यांनी अपल्या जीवनाची पुढील वाटचाल दर्शवणारे हे उध्बोधक असे सूत्र मांडलेले आहे. ह्या सूत्राप्रमाणेच त्यांनी आपल्या जीवनाची वाटचाल शेवटपर्यंत ठेवली.


शैक्षणिक उपक्रम

शालेय विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश सुकर व्हावा म्हणून ते सदैव प्रयत्नशील असायचे. शाळा व महाविद्यालयांना स्वतः भेटी देऊन, प्राचार्यांना भेटून जास्तीत जास्त गरीब व होतकरू, विद्यार्थ्यांना शाळा प्रवेश मिळवून देत. पालकांना त्यांचा फार मोठा आधार होता. गोरगरिबांच्या मुलांचा शाळा प्रवेश सुलभ होई. शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप व खेळांचे साहित्य वाटप ते करीत असत.

अंध-अपंगासाठी ‘जिद्द’ शाळा काढली. अंध-अपंगासाठी जिद्द नावाची गाडीही प्रत्येक अंध अपंगाच्या दारोदारी फिरायची. आज वसंतविहार येथे ‘धर्मवीर आनंद दिघे जिद्द शाळा’ सुरु आहे. शिवनिकेतन ट्रस्टच्या माध्यमातून ‘भारतीय सैनिक विद्यालय’ ही शाळा घोडबंदर रोड वर सुरु केली. सैन्यामध्ये अधिकारी घडविणाऱ्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या निवडक परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांची परिपूर्ण तयारी करणे हे या सैनिकी शाळा कल्याण जवळील ‘खडवली’ येथील ३० एकर जमीन बांधण्यात आलेली आहे.

शैक्षणिक क्षेत्रामध्ये फक्त शालेय शिक्षण देऊन भागणार नाही, तर राष्ट्रासाठी काहीतरी केले पाहिजे. या भावनेने सैनिकी शाळा उघडण्यात आलेली आहे. दिघे साहेबांना अखेरची मानवंदना देताना या मुलांच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्यासारखा होता. डोळ्यांत नुसता अश्रूंचा पूर वाहत होता


सराव परीक्षा

एस. एस. सी. बोर्डाची परीक्षा, बोर्डाच्या नियमानुसार घेणे आवश्यक असते परंतु सामान्य विद्यार्थ्याच्या मनातील भीती दूर करणे, त्यांनी निर्भयपणे पेपर सोडवावेत याचसाठी प्रश्नपत्रिका सोडवून घेणे यालाच सराव परीक्षा म्हणतात, १९९२ पासून दिघे साहेबांनी या सराव परीक्षा घेण्यास सुरवात केली. सदर सराव परीक्षेच्या प्रश्नपत्रिका या तंतोतंत बोर्डासारख्या असण्याचा दिघे साहेबांचा अट्टाहास असे. या सराव परीक्षेसाठी प्रमुख व्यक्ती व कार्यकर्त्यांचा संच त्यांनी निर्माण करून व सराव परीक्षेचे वातावरण प्रसन्न ठेवून विद्यार्थ्याना प्रोत्साहन मिळेल याची दक्षता घेऊन तशा सूचना ते प्रमुख कार्यकर्त्यांना करीत.


लहान मुलांचे दिघे काका

आनंद दिघे साहेबांना लहान मुलांचा विशेष लळा होता. त्यामुळे कार्यालयात येणाऱ्या लहान मुलांना ते आवर्जून जवळ घेत, त्यांची मस्करी करीत. करारी असणारे दिघे साहेब तेव्हा मवाळ भासत. लहान बालके हि त्यांच्याकडे आकृष्ट होत असत. क्वचित प्रसंगी त्यांच्या दाढीला हात लावीत. आलेल्या लहान मुलांना साहेब चॉकलेट अथवा बिस्कीट पुडे, मिठाईचा बॉक्स देत असत. त्यांचा भाचा ‘संग्राम’चा नामकरण सोहळा जैन मंदिरात झाला. त्यावेळेस दिघे साहेब ‘आज मी मामा झालो’ या आनंदात वावरून तो सोहळा साजरा करीत होते. लहान बालकांचे ते कौतुक करीत होते. दिवाळीत लहान मुले स्वखर्चाने खाऊचे पैसे साठवून आपल्या घरासमोर मोकळ्या जागेत मातीचे, थर्माकोलचे विविध किल्ले बनतात. त्या मुलांनी साहेबांना किल्ले पाहायला बोलावले तर साहब वेळात वेळ काढून ते किल्ले पहावयास जात व त्या किल्लेदारांमध्ये रमून जात.

लहान वयाती ती  बालके साहेबांना आवडती होती. त्यांना खेळण्यासाठी प्रोत्साहन म्हणून क्रिकेटचे साहित्य वाटप करीत. मुलांना साहेबांकडचीच बॅट-बॉल लागायची, दुसऱ्या कोणी बॅट-बॉल दिले तरी मुले दिघे साहेबांच्याच बॅट-बॉलसाठी आग्रह धरून जायची. साहेबांच्या वतीने बॅट-बॉल स्वीकारताना त्या बालकांना विलक्षण आनंद होई. लहान – मुलांसाठी वह्या वाटप, त्यांचा शाळा प्रवेश यासाठी साहेब कायम प्रयत्नशील असायचे


काम करण्याची पद्धत

प्रत्येक कामाचा बारीक सारीक तपशील जातीने तपासून, प्रत्येक कार्यक्रम काटेकोर, देखणेपणाने, भव्य दिव्य होईल याकडे त्यांचे बारकाईने लक्ष असे आणि म्हणूनच त्यांनी आखलेले सर्वच कार्यक्रम आगळे-वेगळे होत असत. कार्यक्रम कसा आखीव रेखीव असे. आलेल्या विविध आमंत्र-निमंत्रण यांचे तपशीलवार, दिनांक, वेळ नुसार नोंदणी करून ठेवण्यास ते सांगत. वृतापत्रातील कात्रणे ते काढण्यास सांगून ते  व्यवस्थित जपून ठेवण्यास ते सांगत. सांगितलेले काम झाले कींवा कसे याची स्वतः खातरजमा करीत. प्रत्येक येणाऱ्या पत्राची निवेदनाची, अर्जाची वर्गवारी करून ते व्यवस्थित ठिकाणी ठेवले जाई.

दिघे साहेबांना एखादे काम सांगितले म्हणजे ते झाले या श्रद्धेने लोक येत असत. या श्रद्धेला त्यांनी कधी तडा जाऊ दिला नाही. एकदा सांगितलेले काम ते स्वतः लक्षात ठेवीत त्यामुळे कोणाचे केव्हा व कसे काम होईल ते स्वतःच त्याला सांगत. मात्र वेळ लागला तरी ते काम कसे होईल ते पाहत. एखाद्याचं काम होत नाही म्हटल्यास त्यांना स्वतःलाच अपराध वाटे. त्यांचे काम होईपर्यंत ते कासावीस होत असत. अनेक काम कसे होईल याबाबत ते प्रत्नशील असत.

त्यांनी हजारो रुग्णांना वेळेवर रक्त पुरवठा करून व औषधोपचार देऊन त्यांचे प्राण वाचवले आहेत. हजारो बेकारांना नोकरी उद्योग व्यवसाय मिळवून दिला. अनेकांच्या झोपड्या वाचविल्या. अनेक संघर्ष उमटविले. भांडण तंटे मिटवले. गुन्हेगारीच्या वाटेवर भरकटलेल्या अनेकांना सुधारून विधायक कामाला, संसाराला लावले. तहानभूक विसरून अहोरात्र नि:स्वार्थी भावनेने काम करणारा विरक्त नेता असणे हि विलक्षण घटना आहे.


थोरा मोठ्यांचा मान सन्मान

दिघे साहेबांच कार्यालय सतत तीनशे पासष्ट दिवस अहोरात्र माणसांनी गजबजून गेलेले असे. शिवदरबारच होता तो ! या दरबारात दिघे साहेबांनी कुशलतेने जमवलेली निस्वार्थी कार्यकर्त्यांचा ताफा ते सांगतील त्याप्रमाणे काम करण्यास सतत सिद्ध असे. या कार्यालयात येणाऱ्या अबालवृद्धासह मान्यवर लोकांचे सतत येणे-जाणे होई. मात्र साहेबांच्या शिस्तीमुळे या सर्वांचे आदराने स्वागत होई. त्यांचे निरोप देत, त्यांचे म्हणणे ऐकून ते साहेबांना सांगणे आदी कामे बिनबोभाट चालत. स्वतः दिघे साहेब वडीलधाऱ्यांचा आदर मानसन्मान करीत.

बाळासाहेबांवर त्यांची श्रद्धा. त्यांचा फोन घेताना देखील ते उठून उभे राहत. इतर मान्यवर नेते, साहित्यिक, विविध क्षेत्रातील जाणकार कार्यालयात आले तर ते पुढे जाऊन स्वागत करीत. जाताना दरवाजापर्यंत पोहोचण्यास जात असत. गुरुपौर्णिमेला ते अनेक ठिकाणी जाऊन थोरामोठ्यांचे आशिर्वाद घेत.

शिवसेनेच्या वरिष्ट नेत्यांचे स्वागत करण्यास ते स्वतः ठाण्याच्या वेशीवर जातीने हजर राहत. हि प्रथा त्यांनी ठाण्यात सुरु केली टी आजतागायत सुरु आहे. एखाद्या मोठ्या मोठ्या व्यक्तीचे काम जरी साहेबांकडे असले व त्यांनी आनंद्श्रमात येण्याचे विचारले तरी साहेब स्वतः त्यांच्याकडे जावून त्यांचे काम करून देत. श्री. मो. दा. जोशी यांनी त्यांचा शिवसेना प्रवेशाचा अर्ज भरला होता म्हणून ते मो. दा. चा कायम आदर करीत. के. रा. गुजराथी सर हे त्यांचे शिक्षक म्हणून ते त्यांचा आदर करीत.  कोणत्याही प्रसंगी ते या दोघांवर रागावल्याचा कोणी पाहिलं नसेल. उलट नेहमी त्यांचा आदरयुक्त उल्लेख करून त्यांचे विषय कृतज्ञता दर्शवीत.

लहानापासून मोठ्यापर्यंत लोकं त्याचे वाकून दर्शन घेत. ते  थांबविण्याचा प्रयन्त  करीत पण लोक आदराने पाया पडतच असत. हातातील कामे, फोन व अचानक पडलेल पाया यामुळे त्यांचाही नाईलाज होई. यावर बरीच टीका होई. मात्र ते अडला हरी असे आपल्या मुलाखातीतून सांगून ते त्यांना हरीची उपमा देत. यावर त्यांच्या मनातील भावना समजते. साधू-संत, वारकरी संन्यासी कायम साहेबांकडे येत असत. त्यांना कधीही खाली हातांनी पाठवले नाही. आदराने त्यांची उठ-बस करीत.


उत्सव प्रिय आनंद मूर्ती

‘आम्हाला भारतीय’ संस्कृतीचा अभिमान आहे, आम्ही भारतीय परंपरा जपतो.’

असा टेंभीनाक्यावर प्रत्येक उत्सवाच्या वेळी झळकत असे. या उक्तीला साजेसे कार्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी केले. ब्रह्मचारी आयुष्य, त्यागी वृती, स्वधर्माबद्दलचा व भारतीय संस्कृतीचा सार्थ अभिमान बाळगणारे आणि सण-उत्सवांच्या माध्यमातून भावी पिढीसमोर आदर्श निर्माण करणारे ते संस्कृती संवर्धक ठरले.

भिवंडी-कल्याण येथील शिवजयंतीवर सरकारी बंदीचे सावट दरवर्षी असायचे. परंतु साहेब त्याही परीस्थितीत स्थानिक शिवसैनिकांसह या शिवजयंती मिरवणुका मोठ्या जल्लोषात काढीत. दरवर्षी सकाळी ठाण्यातील टेंभीनाका, सिव्हील हॉस्पिटल, कॅसल मिल येथील शिवजयंतीचे पूजन करून साहेब भिवंडीकडे रवाना होत नंतर कल्याण व इतर ठिकाणच्या शिवजयंतीना साहेब उपस्थित राहून रात्री ठाणे शहरातील श्री शिवजयंती उत्सवांना भेट देत.

टेंभी नाक्यावर त्यांनी सुरु केलेला नवरात्रो उत्सव हा संपूर्ण ठाणेकरांचा उत्सव झाला आहे. या नवरात्रौत्सवात देवीची आगमन मिरवणूक तर महाराष्ट्रभर चर्चेत पण पाहण्याचा विषय झालेला आहे. शिस्तबद्ध पण जल्लोषात विवध कालाकृतीसह, सांस्कृतिक खेळ, विविध वाद्ये यांनी साग्रसंगीत असलेली भव्य दिव्य ‘आगमन मिरवणूक’ याची देही याची डोळा’ पाहण्यासाठी आबालवृद्ध गर्दी करतात. डोळ्याचे पारणे फिटावे असे दृश्य त्या वेळी असते. हि किमया दिघे साहेबच करो जाणे. शिवसेनाप्रमुख, तसेच लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन, उद्धव ठाकरे, मनोहर जोशी आदी महान नेत्यांपासून मंत्री मंडळातील मंत्री, शासकीय अधिकारी, मान्यवर साहित्यिक, चित्रपट – नाट्य क्षेत्रातील नामवंत कलावंत यांनी या उत्सवाला भेटी दिल्या आहेत. नऊ दिवस टेंभिनाक्यावर जत्राच भरलेली असते.

श्री. हनुमान जयंती उत्सव, छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव त्यांनी टेंभी नाक्यावर साजरे केले.

ठाण्यातील लोकांना हांडी उत्सव पाहण्यासाठी मुंबईस जाण्यास लागू नये तसेच ठाण्यातील दहीहंडी पथकांना संधी व प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यांनी टेंभीनाक्यावर दहीहंडी उत्सव चालू केला. त्यामुळे उंचच उंचच मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडण्याचे दृष्ये ठाणेकरांना पहावयास मिळाले. ठाण्याबाहेरील मोठे गोविंदा पथक ठाण्यात यावेत म्हणून दोन हंड्या बांधण्यात येऊ लागल्या. त्यांना भव्य बक्षिसे देण्यात येत. त्यामुळे मुंबईचे मोठे-मोठे गोविंदा पथक ठाण्यात येऊ लागले आणि हंडी फोडण्याची चुरस निर्माण झाली. या उत्सवाचे थेट प्रक्षेपण सुमारे १५० देशात दाखवले जाऊ लागले. दहीहंडी उत्सवाला सातासमुद्रापार पोहचवण्याचे महान कार्य दिघे साहेबांनी केले. आज ठाण्यात त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवून ‘गोविंदा’ उत्सव साजरे केले जात आहेत.

दिवाळीच्या दिवशी आनंद आश्रमात दिवाळीच असे. शुभेच्छा पत्र पाठवणे, आलेली शुभेच्छा पत्र लक्षपूर्वक वाचून त्यावर प्रतिक्रिया देणे. मिठीचे वाटप दिघे साहेब करीत. अत्यंत आनंदी मूडमध्ये साहेब त्यावेळी असत.

धुळवडीनिमित्त ते सकाळी आपल्या कार्यालयात रंग उडविण्याचा कार्यक्रम करीत. यासाठी ते अस्सल गुलाल व रंग वापरीत. या वेळी जुने नाही तर नवीन कपडे ते घालीत. कार्यकर्त्याशी होळी खेळण्यात दंग होत. त्यानंतर ते आपले राजकीय रंग विसरून ते ठाण्यातील इतर मान्यवर पक्षातील नेत्यांकडे होळी खेळण्यास जात. त्यांना या रंगपंचमीत गुलालाने न्हाऊ घालीत. अत्यंत खेळीमेळीने ते हा उत्सव साजरा करीत.

चंदनवाडी गणेशउत्सवात ते सामाजिक, राष्ट्रीय विषयांवर सजावट साकार करीत. त्या सजावटीतून समाजाला संदेश देण्याचा त्यांचा प्रयन्त असे. लोकमान्य टीळकांचे सार्वजनिक गणेशोत्सवा संबधीचे विचार तंतोतंत अमलात आणण्याचे कार्य ते करीत. त्यांनी चंदनवाडी गणेशउत्सवात साकार केलेल्या भारतीय स्वातंत्र्य लढा, काश्मीर प्रश्न, रामजन्मभूमी या सजावटी पाहण्यासाठी महाराष्ट्रातल्या विविध भागातून लोक येत असत. सजावटीचा आशय आणि विषय लोकांपर्यंत पोहचण्यासाठी त्यांनी ध्वनी व प्रकाश (कॅसेट)च्या माध्यमातून निवेदनाचा प्रारंभ केला. गणेशउत्सवाच्या आराशीना एक वेगळेच महत्व दिघे साहेबांनी प्राप्त करून दिले. पुढे तीच परंपरा ठाणे व इतर शहरातून सुरु झाली. त्यामुळे सामाजिक, शैक्षणिक, राष्ट्रीय देखावे गणेसत्सवात मोठ्या प्रमाणात साकार होऊ लागले व लोकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला.

पुढे त्यांनी ठाण्यातील गणेश उत्सव मंडळांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या कला गुणाचे कौतुक व्हावे म्हणून शिवसेना ठाणे जिल्हाशाखेतर्फे ‘श्री गणेशदर्शन स्पर्धेचे’ आयोजन केले. या आयोजनाच्या माध्यमातून त्यांनी ठाण्यातील गणेश उत्सव मंडळात नवचैतन्य निर्माण केले. कार्यकर्त्यांना हुरूप आला. नेपथ्यकार, चित्रकार, सजावट करणारे कलाकार यांना प्रोत्साहन मिळाले. या मंडळांना राष्ट्रीय वृत्ती, सामाजिक बांधिलकी, हिंदुत्व जागृती, शैक्षणिक गरज या विषयांची जाणीव करून दिली. उत्सवातील धार्मिक पावित्र्य राखण्याची. शिकवण दिली. त्यामुळे ठाण्यातील गणेश उत्सव मंगलमय वातावरणात दिसू लागेल. विविध विषयांवरील सजावटीची चढाओढ निर्माण झाली. स्वतः दिघे साहेब सजावट पाहण्यास येणार म्हणून उत्सव मंडळे आनंदी होऊन झपाटून  कामाला लागत. दरवर्षी गडकरी रंगायतनमध्ये होणारा शिवसेना ठाणे जिल्हा गणेश दर्शन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा म्हणजे एक आनंद सोहळाच असे. देखणा, दृष्ट लागण्यासारखा हा पारितोषिक वितरण समारंभ असे. गणेश चतुर्थी अगोदरच श्री गणरायांचे वाजत गाजत झालेले आगमन लोकमान्य टीळकांचे मनोगत, उत्कृष्ट सजावट, मनोरंजन कार्यक्रमाचे सदरीकरण व पारितोषिक वितरण समारंभ, हे सर्व ठाणेकरांना अचंबा करण्यासारखे असे.

या पारितोषिक वितरण सोहळ्यास शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, बाबासाहेब पुरंदरे, अण्णा हजारे, बाबामहाराज सातारकर, उद्धवजी ठाकरे,ज्योतीभास्कर जयंत साळगावकर, श्री जयंत नारळीकर, साहिल लुथियानवी, मनोज कुमार, रमेश देव, प्रभाकर पणशीकर, मोहन जोशी आदी विविध क्षेत्रातील  मान्यवरांनी उपस्थिती लावून या आगळ्या वेगळ्या सोहळ्याचे कौतुक केले आहे.

या गणेश दर्शन स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेचे परीक्षक मंडळ हे विविध थरातील मान्यवर असत श्री. वि. ह. भूमकर सर, सौ मंजिरीदेव, सौ. साधना अमृते, डॉ. मोहन सोहनी, वास्तुविशारद शशी डोंगरे, शशी देशमुख, प्रा. अशोक चिटणीस सर आदि परीक्षकांना यात सहभागी करून घेतले. मंडळास भेट देऊन त्याचं परीक्षण करून निकाल जाहीर करीत त्यामुळे या स्पर्धेचा दर्जा उंचावला गेला व गणेश मंडळ सजावटीची आरास करण्यची चुरस निर्माण झाली ठाणे जिल्हा शिवसेनेची गणेश दर्शन स्पर्धा म्हणजे श्री गणेश मंडळांना प्रेरणा स्त्रोतच झाली.

अशा सामाजिक राजकीय उत्सव व कार्यकर्त्यांसोबत साहेब दरवर्षी न चुकता १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी रोजी शासकीय झेंडावंदन कार्यक्रमास उपस्थित राहत.

तसेच हरीनाम साप्ताह, विविध ठिकाणी आयोजन केलेले धार्मिक उत्सव व कार्यक्रम यांना ते उपस्थिती लावीत याचबरोबर मुस्लीम बांधवांच्या इफ्तार पार्टीस ते आवर्जून जात, नुरीबाबा उत्सवाला भेट देत, कार्यकर्त्यांच्या घरी असलेल्या पूजा, बारसे अथवा लग्न सोहळा यांना साहेब न चुकता जात असत. साहेबांची उपस्थिती हेच त्या उत्सवाचे कार्यक्रमाचे आकर्षण असायचे. यजमानाला साहेब येणार, साहेब आले, साहेब येऊन गेले याचे केवढे अप्रूप असे.

ठाण्याच्या सांस्कृतिक कार्यात दिघे साहेबांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. काळाची पुढील पावले ओळखून भविष्यात समजाच्या हिताचे निर्णय घेण्याची कुवत त्यांच्यापाशी असल्याने त्यांची अनेक सेवाभावी उपक्रम सुरु केले आणि यशस्वी केले.

दिवाळीत ते इतरांना भेटवस्तू देत असे स्वतःही स्वीकारत असत. त्यांचे दिवाळी भेट कार्ड ते दरवर्षी पाठवीत, त्यांचे दिवाळी भेट कार्ड ते  दरवर्षी पाठवीत. त्यांचे दिवाळी भेट कार्ड म्हणजे जणू संदेशच असे. त्यात जीवनाचा अर्थ बोध असे. एका दिवाळी शुभेच्छा संदेश पत्रात त्यांनी म्हटल होत…

हसून पहाव रडून पहाव
जीवनाकडे डोळे भरून पहाव
कहीतरी देण्यासाठी घ्यावं
आपण गेक्यानंतर ही कोणीतरी
आपल नाव काढावं
प्रेम देशावर करावं  धर्मवीर कराव
माणसांवर कराव माणुसकीवर वर कराव पण…
प्रेम मात्र मनापासून करावं
जीवनाचा किती गर्भित अर्थ आहे या संदेशात !

गतवर्षाला निरोप व नववर्षाच स्वागत करण्यासाठी म्हणजे थर्टी फस्ट साजरे करण्यासाठी अवघ जग धुंदीत, मस्तीत, बेहोशीत व जल्लोशात असताना ठाण्यात मात्र सिव्हील हॉस्पिटलमध्ये ३१ डिसेंबरच्या मध्य रात्री मानवाला जीवनदान देणाऱ्या श्रेष्ठ रक्तदान शिबीराच आयोजन केल जात धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या संकल्पनेतून सातत्याने राबविला जात असून ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक, धुळे, नगर, पुणे आदी जिल्यातून असंख्य तरुण ‘राष्ट्रीय कर्तव्य’ म्हणून या शिबिरात रक्तदान करून मानवता वादी दृष्टीकोनातून गरजवंताना नवसंजीवन देण्याच उत्तरदायीत्व पत्करून अनोख्या पद्धतीने नववर्षाचे स्वागत करीत आहेत. विक्रमीवेळा रक्त दान करणाऱ्या रक्तदात्यांना ‘रक्तकर्ण पुरस्कार’ या वेळी दिला जातो. सातत्याने हा उपक्रम राबवण्यासाठी जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली रक्तदान ग्रुपचे अध्यक्ष नारायण पाटील, हेमंत पवार, रवींद्र काडणे, सिव्हील हॉस्पिटलचे डॉक्टर व कर्मचारी आदी प्रयन्तशील असतात.


पूरग्रस्त व अपादग्रस्तांना मदत

संकटकाळी धावून जाणे हा साहेबांचा सर्वात मोठा गण. कोणाच घर कोसळलं. इमारत खचली जुन्या इमारतीची पडझड झाली पावसाळ्यात महापूर येऊन नाल्याकाठची घरे वाहून जात. अशावेळी साहेब त्वरेने घटनास्थळी जात. तातडीने मदत कार्य होत होती घेत. संकटातून बाहेर काढणे. दिलासा देणे, अन्नधान्याची व्यवस्था करणे, नुकसानीची खातरजमा करून त्यांना साहित्य वाटप करणे, मुलांना शालेय वस्तू देणे, घर उभारणीसाठी मदत करणे औषधउपचार आदी मार्गाने मदतीचा हात देत. त्यामुळे कोणतीही आपत्ती आली कि लोक साहेबांकडे धाव घेत. ठाण्यात अश्या नेक घटना घडल्या आहेत. आणि साहेब त्वरेने तेथे जाऊन त्यांनी मदतकार्य केलेले आहे. एवढेच नव्हे तर….


पूरग्रस्त जांभुळपाडा

२३ जुलै १९८९ रोजी मध्यरात्री रायगड जिल्ह्यातील आंबा नदीला महापूर आला. अंबा नदी शेजारील ‘जांभूळपाडा’ गाव या पुराने पुरता वेढला गेला.

जांभूळपाडा व आजूबाजूच्या परिसरात १२ ते १५ फुटांवरती पुराचे पाणी वाहू लागले. या पुराच्या लोंढ्यात काही जन वाहून गेली. घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. काळोख्या अंधारात, पुराच्या थैमानाने एकच हाहाकार माजला. अवघा रायगड जिल्हा हादरून गेला. हि बातमी दिघे साहेबांना समजताच त्यांनी २४ जुलै च्या पहाटे मदतीची कुमक घेऊन कार्यकर्त्यांसह जांभूळपाड्याकडे धाव घेतली. तेथील ते भयाण व विदीर्ण वातावरण पाहून ते सर्व हळहळले. संपूर्ण गावाची वाताहात झाली होती. घरे-दारे उधवस्त झाली होती. तरी काही माणसे व जनावरे वाहून गेली होती. विजेच्या खांबाच्या टोकावर पाणी चढले होते. एकाच आकोराश चालला होता. याच कमी – अधिक फरकाने अंबानदी वाहत असलेल्या काठावरील इतर गावांची देखील दुर्दश झालेली होती. पेण – नागोठणे देखील पाण्याखाली गेले होते. साहेबांनी तातडीने मदत कार्य हातात घेतले. आणलेले अन्नधान्य, कपडे-लत्ते यांचे वाटप गेले. मदत कार्यास सुरवात झाली. आंबा नदीला पूर पावसाचा कि तटाच्या धरणातून सोडलेल्या पाण्याच्या ? या वादाकडे लक्ष न देता दिघे साहेबांनी या सर्व परिसरात दौरे काढून मदत कार्य सुरु ठेवले. अन्न  धान्य कपडे लत्ते, भांडी, स्टोव्ह, चादरी आदी जीवनावश्यक वस्तू आपादग्रस्ताना पुरविल्या. रोगराईला आळा बसण्यासाठी २५-३० डॉक्टरांचे पथक घेऊन जांभूळपाडा, पाली, पेण, नागोठणे परिसरात ठीक-ठिकाणी वैद्यकीय शिबीर भरवून औषधांचे मोठ्या प्रमाणावर वाटप केले. शिवसेनेची मदत घेताना लोक कृतज्ञतेने पहात होते. दररोज सकाळी ६.३० च्या सुमारास ठाण्याहून निघणे मदत कार्य करणे व रात्रो. २.३० वा. च्या सुमारास परत येणे असा काही दिवस दिनक्रम ठरू ठरून गेला होता. दिघे साहेब कुठेही न थकता हे सर्व करीत होते. ठाण्यातून मदतीचा ओघ त्यांनी जांभूळपाडा व परिसराकडे नेला. अपादग्रस्तांना दिलासा व मदत मिळाली. आनंद दिघे नावाची व्यक्ती परमेश्वर रूपाने धावून आल्याचे लोक म्हणत.

महाराष्ट्रात वा देशात कुठेही झालेल्या दुष्काळग्रस्त, पूर पिडीतांसाठी शिवसेनेतर्फे  ‘मदतनिधी’ गोळाकरण्यासाठी ते स्वतः फिरत. पिडीतांसाठी तळमळीने धावणे हा त्यांचा गुण येथे प्रकर्षाने जाणवत असे.


श्री मंगल गड मुक्ती आंदोलन

सह्याद्रीच्या कुशीतील ठाणे जिल्ह्यात असलेले श्री मंगलगड हा शिल्हार राजाचा पुरातन किल्ला. प्राचीन ऋषीमुनींची पवित्र तपोभूमी. यज्ञ –यागांनी व प्रभु रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली पवित्र भूमी. वारकरी संप्रदाय, नाथ सांप्रदाय, नाथ सांप्रदायाचे पुज्यास्थान, गुरुदेव दत्ताचे पुत्र श्री मंगल मच्छिंद्र समाधीने तीर्थस्थान रुप झालेली ही भूमी म्हणजेच किल्ले श्री मंगलगड

सुमारे ९०० वर्षापूर्वीचे नागपंथ प्रवर्तक श्री मच्छिंद्र नाथांचे, हे स्थान रिवाज संस्कार हे सर्व ‘दार्शनिक नाथांचे’ सर्व उत्सव माघी पौर्णिमेस नाथ पद्धतीने होतो. परंतु निरनिराळ्या थडग्यांचा निमित्ताने आपल्या आक्रमक प्रवृत्तीचा परिचय मुसलमान समाजाने करून दिलेलाच आहेच. त्याच प्रकारच्या युक्तीचा भाग म्हणून ‘बाबा मलंग’ चा प्रचार केला जात आहे.

हिंदू संस्कृती नष्ट करून ते स्वतःचा हक्क प्रस्थापित करू पाहत आहेत. अशा आक्रमक प्रवृत्तीस विरोध करून ‘हाजी मलंग न्हावे श्री मलंग’च असा नारा देऊन हे स्थान असल्याचे मोहनदादा गोखले, केतकर, सत्यपाल मालानी इत्यादी थोर हिंदू विचारवंतांनी व गाढ्या अभ्यासकांनी सकारण पटवून देऊन हिरव्या विळख्यातून मलंगगड मुक्त करण्याचा निर्धार केला.

दिघेसाहेबांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेशी या विषयावर सविस्तर चर्चा करून यासाठी त्यांचे सहकार्य व मार्गदर्शन घेतले. बाळासाहेबांनी स्वतः या कामी पुढाकार घेऊन तमाम हिंदूना या मलंग गडावर आपली वहिवाट सुरु करण्याचा आदेश दिला. ठाणे जिल्हाप्रमुख आंदन दिघे यांनी या धर्मकार्यासाठी स्वतःला झोकून दिले. वेळ पडल्यास प्राणाला मुकण्याची गर्जना केली. शिवसेना प्रमुखांचे आवाहन ‘चलो श्री मंगल गड’! अशी गर्जना करून तमाम हिंदुत्व निष्ठांना माघी पौर्णिमेस श्री मलंग गडावर कूच करावयास लावले स्वतः जातीने या आंदोलनाची तयारी व सिद्धता केली. ठाणे जिल्ह्यास महाराष्ट्रातून ‘जय मंगल श्री मंगल’ चा गजर करीत हिंदुत्व निष्ठांची मांदियाळी मलंग गडावर येओऊ लागली. संपूर्ण मलंगगड परिसर दरवर्षी भगवामय होऊ लागला. सर्वत्र मलंग मच्छिंद्र नाथांचा जयघोष होऊन हिंदूनी आपली वहिवाट सुरु केली. वृद्ध, तरुण, महिला – बालके यांनी मलंग गडाचा परिसर फुलून जाऊ लागला. शिवसेना नेते, मंत्री यांना गडावर दर्शनासाठी पाचारण केले. शिवसैनिकांची अभेदय फळी उभारून पायथ्यापासून मंदिरापर्यंत खडा पहारा दिला. माघी पौर्णिमेच्या उत्सवाला मग उधाण आले. साधुसंत, वारकरी यांना निर्भयपणे उत्सवात सहभागी होता आले.

हाजीमलंग कि श्री मलंग या वादात शासन मोहनदादा गोखले, केतकर सत्यपाल मालानी, दिनेश देशमुख, आनंद दिघे आदी नेत्यांवर बंदी आदेश जारी करीत असे. या स्थळांबाबत ठाणे कोर्टात १/८२ हा दाव पडून आहे. त्यामुळे माघी पौर्णिमेच्या आगोदर वातावरण तप्त होई पोलीसबळाचा वापर करून शासन या हिंदू नेत्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न करीत असे. १९८७ पासुन शिवसेनेने या आंदोलनात सक्रीय भाग घेतला. ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांना या आंदोलनाची सूत्रे हाती घेतली. ते शासनास रोख ठोक प्रतीउतर करीत.


“हिंदू धर्मस्थळांचे इस्लामीकरण होऊ देणार नाही”  – आनंद दिघे

शासनाने किवा पोलिसांनी बंदी हुकुमाच्या नावाखाली हिंदुच्या धार्मिक भावनाची गळचेपी करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही तो हुकुम मोडून श्री मलंग दर्शनास जाणारच ! जिल्ह्यामध्ये  ठिकठिकाणी याच्या निषेधार्थ सत्याग्रह होउन तुरुंग भरले जातील. तसेच जिल्यातील प्रमुख शहरे बंद ठेवण्यात येतील. यातून उत्भाविणाऱ्या परीस्थितीला शासन जबादरा असेल. आमचा हेतू श्री मंगल गडावर हिंदूची वहिवाट मिर्माण करणे हाच असल्याने आम्ही या दिवशी गडावर जाणारच !

या संपूर्ण मलंग गड मुक्ती आंदोलनास आनंद दिघे साहेबानी स्वतःस झोकून दिले. तहान-भूक विसरून ते या साठी झटत असत. माघी पौर्णिमेच्या उत्सवाच्या आगोदर ते स्वतः तयारीला लागत. सर्व तयारी झाली कि उत्सवाच्या एक दिवस अगोदर कल्याणात एक दिवस मुक्काम करून तेथील शिवसैनिक, पदाधिकारी, हिंदुत्व निष्ट यांच्या संपर्कात असत. जेणे करून हा उत्सव मोठ्या जल्लोषात व गर्दीत होईल. सकाळी स्वत सर्व भाविकांचे स्वागत करीत. सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवीत. आलेल्या भाविकांना मार्गदर्शन करीत दुपारनंतर ते स्वतः गडावर पूजेसाठी निघत. गडावर जाताना वाटेतील सर्व मंदिरांना भेटी देत मंदिरातील देव-देवतांचे दर्शन घेत. श्री मलंग मच्छिंद्र नाथांच्या समाधीचे दर्शन घेऊन तेथे यथासांग आरती करण्यात येई. असा दिघे साहेबांचा दरवर्षी नित्य पाठ असे.

एके वर्षी समाधीस्थळाजवळ पोलिसांनी दिघे साहेबांसह शिवसैनिकांवर लाठी हल्ला केला. या सर्वाना अटक झाली. मात्र यानंतर दरवर्षी शासन आणि पोलीसांच्या दबाव तंत्राला न डगमगता दिघे साहेबांनी हे आंदोलन जोमाने सुरूच ठेवले. आपला न्यायिक लढा अधिक तीव्र केला. ‘श्री मलंग मुक्ती आंदोलन’हे दिघे साहेबांच्या जीवनातील एक वेगळच पर्व होते


नवनाथांची सासण काठी

नवरंगाच्या कापडाच्या पेहरावाने नटलेली ११ फुटी लांबीची बांबूची काठी याच काठीला ‘नवनाथांची सासण काठी’ असे म्हणतात माघ पौर्णिमेस ‘ओम चैत्य कानिफनाथ’ मंडळास साहेबांकडून बोलवणे असायचे. १९९७ च्या माघ पौर्णिमेस मलंगडने ट्रस्टी व कानिफनाथ मंडळ यांच्यात वाद निर्माण झाला. त्यावेळी साहेब गडाखाली होते. वाद निर्माण झाला हे समजल्याबरोबर साहेब धावत पळत गड चढू लागले. त्यांनी सर्वांची समजूत काढून आरती करण्यास सांगितले. त्यावली कानिफनाथ माद्लाने नवनाथांची सासण काठी मच्छिंद्र नाथ  (मलंगबाबा) यांच्या पवित्र समाधीला स्पर्श करून, धूप लोभान सहित आरती सुरु केली. वातावरण भक्तिमय झाले. अश्या प्रकारे हिंदु धर्मियांना एकत्रित आणण्याचे मोठे काम दिघे साहेबांनी केले म्हणून त्यांना ‘धर्मवीर’ म्हणून ओळखले जाते.


दुर्गा देवी घंटानाद आंदोलन

कल्याण मधील दुर्गाडी किल्ल्यावरील देवीच्या मंदिरात बकरी ईदच्या दिवशी पोलीस हिंदुना प्रवेश बंदी करीत. कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे पोलिसांचे म्हणणे असे. घटनेनुसार आम्हला देवीचे दर्शन व पूजा – आर्च करण्याचा अधिकार असताना फक्त मुस्लिमांना खुश करण्यासाठी ईदच्या दिवशीच अशी बंदी का ? असा खडा सवाल करीत दिघे साहेबांनी शिवसेनेच्या वतीने या दिवशी किल्ले दुर्गाडीवर घंटानाद आंदोलन करीत. त्यावेळी त्यांना अटक करीत असत. दरवर्षी आनंद दिघे आंदोलनासाठी कल्याणला जाऊन स्वतःला अटक करून घेत असत. तीव्र आंदोलन छेडीत शासनाचा धिक्कार करीत. प्रचंड जय घोषात दुर्गाडी परिसर दणाणून सोडीत.