(धर्मवीर श्री. आनंद दिघे यांचे मनोगत – त्यांच्याच शब्दात !)
मी ठाण्यात राहत नसतो तर ‘आनंद दिघे’ झालो नसतो याविषयी माझ्या मनात जराही शंका नाही.
‘आनंद दिघे’ म्हणजे आज मी जो काय सार्वजनिक जीवनात आहे तो. किंबहुना खाजगी जीवनातदेखील. ठाण्याने मला शिकवले, घडवले, निर्माण केले. मोठे केले, सत्ता दिली, सेवेचे शिक्षण दिले. नेतृत्वचे प्रशिक्षण दिले.
ठाण्याने मला प्रेरणा दिली. स्फूर्ती दिली. कीर्ती दिली. ठाण्याने ‘गाव’ दिले. ठाण्याने प्रेम दिले. स्नेह दिले. चाहते दिले. अनुयायी दिले.
ठाण्याने मला जगायचा हेतू दिला. मरण्याच्या भीतीतून सोडवले. ठाण्याने मला जगण्याचा मंत्र दिला जगण्याचे तंत्र दिला. जगण्याचे तंत्र दिले. जगण्याची दिशा दिली. स्वतःसाठी नव्हे, तर इतरांसाठी जगण्याचा आनंद दिला. ठाण्याने मला कधी निराश केले नाही. हताश केले नाही. उदास केले नाही. वैफल्य दिले नाही स्वतःचा संसार न करताही साऱ्या ठाणेकरांनी मला त्यांच्या संसारात सामावून घेतले. कुणी मुलगा म्हणून, कोणी भाऊ म्हणून, काका, मामा, दादा, अश्या जिव्हाळ्याच्या नात्यांचा अनुभव दिला. एकता राहूनही मला कधी एकटे पडू दिले नाही. एकटा राहूनही एकटेपणा मला कधी वाटू दिला नाही.
ठाण्याने मला कौतुकाने धर्मवीर म्हटले. आदराने दिघे साहेब म्हटले पण संबोधन काहीही वापरले तरी त्यांच्या मनात असलेल्या ‘आनंद’ चेच ते उद्गारचिन्ह होते. माणसे कशाकशाने घडतात. कोणी अनुभवाने घडतो. मला लोकांच्या ‘भावा’, ने भावनेने घडवले असे मी मानतो. लोकांनी माझ्याकडून ज्या इच्छा, अपेक्षा केल्या त्यानुरूप मी घडत गेलो. त्यांनी माझ्या विषयी ज्या भावना, कल्पना मनात आणल्या तसा मी होत गेलो.
असे म्हणतात कि, प्रत्येक शहराचा एक आत्मा असतो आणि तो आत्मा वास करण्यासाठी एक देह शोधात असतो. सुफी संतवाड्मयातील ही कल्पना आहे. मला वाटते तसे माझ्याबातीत घडले असावे. ठाण्याचा सूक्ष्मस्वरूप आत्मा, प्रकटिकरणाचे साधन ठरलो आणि माझेकरवी हे त्यानेच करवून घेतले. अन्यथा, मी एक सामान्य माणूस, लोक मला जे असामान्यत्व देतात ते असे कुठल्याही दैवी – सुदैवी शक्तीची देणे असावे.
मी ठाण्या ऐवजी जर पुण्यात जन्माला आलो असतो तर ? झालो असतो का आज आहे तो, तसा ‘आनंद दिघे’ नसतो प्रत्येक शहराची एक संस्कृती असते. जसे अमुक एक झाड तमुक एक प्रकारच्या मातीतच रुजते. आणि त्याला एक विशिष्ट हवामान लागते, तशी विशिष्ट गावात, वातावरणात विशिष्ट संस्कृतीत जन्मतात, वाढतात, मोठी होतात तशी ती तिथे असतात म्हणूनच तशी होतात. टिळक – आगरकर पुण्यात होऊ शकतात. मुंबईत कॉ. डांगे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे निर्माण होतात. कुसुमाग्रज नाशिक मध्ये तर रणजीत देसाई कोल्हापुरात मोठे होतात. हे जसे भव्यदिव्य व्यक्तीमत्वाबाबत आहे असे माझ्यासारख्या अल्पस्वल्प कार्यकर्त्यांचा काल कर्तुत्व, व्यक्तित्व याबाबतही खरी आहे. मी पुण्यात असतो तर काय झालो असतो ते सांगू शकत नाही पण आज ठाण्यात आहे तो ‘आनंद दिघे’ झालो नसतो एवढे नक्की. अगदी शेजारच्या मुंबईत अगदी जवळच्या मुलुंडमध्ये असतो तरी नक्की ‘आनंद दिघे’ झालो नसतो. ही ठाण्याची किमया, ही ठाण्याची माया. कारण ठाण्याची वेगळी आहे दुनिया !
मुंबई शेजारी असून ठाणे धंदेवाईक नाही. ठाण्यात लोक व्यवसाय करतात, धंदे नव्हते, कारण इथला माणूस अजूनही स्वतःला किंवा दुसऱ्याला खरेदीविक्रीसाठी उपलब्ध वस्तू मानत नाही. इथल्या माणसाला फायदा कमवावा हि इच्छा असते पण गैरफायदा घ्यावा हि वृत्ती नसते. इथला दुकानदार गिऱ्हाइकाला गिऱ्हाइक मानतो पण त्याला गिऱ्हाईक करून फसवावे असे करीत नाही. मुंबईत माणसे पैशाला भजतात, पूजतात, संपतील भुलतात,
देखाव्याने खुलतात आजून ठाणेकर मुखवटा आणि चेहरा यातला फरक जाणतो आणि मुखवट्यावर नव्हे तर चेहऱ्यावर प्रेम करतो आणि म्हणूनच माझ्यासारख्या सरळसध्या माणसाला, रांगड्या माणसाला इथे प्रेम मिळाते, महत्व लाभते, मान दिला जातो. मंबई ही रजोगुणी नगरी आहे. ठाणे सत्वगुणी आहे. इथे आजून बुजुर्गाविषयी आदर आहे. गुरुजानांची कदर आहे. म्हणूनच ठाण्याच्या गडकरी रंगायतनध्ये रंगतो तसा प्रयोग अन्य कुठेच रंगत नाही असे सर्वसंचारी कलाकारसुद्धा सांगतात.
ठाण्याच्या राजकारणात सर्व राजकिय पक्ष आहेत. त्यांच्यात सत्तास्पर्धा आहे पण वैयक्तिक द्वेष नाही. दुष्मनी नाही, म्हणूनच एकदा निवडणूक झाली कि, माणसे आपापल्या पक्षांचे गणवेश उतरवून ठेवतात आणि मित्रांच्या वेशात घरोब्याने वागू लागतात. इथे स्वपक्षात भांडणारा माणूसही समोरच्या पक्षातील माणसांबरोबर नांदणार असल्याचे दृश्य नेहमीच आहे.
ठाणे हे हाकेला ‘ओ’ देणारे गाव आहे. इथे साद घाला तुम्हाला प्रतिसाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. इथे संकटात कोणी एकाकी नसतो. दु:खात एकटा नसतो. इथे लग्नकार्यात तर यादी कागद अपुरे पडतात आणि मांडव लहान वाटू लागतो इतके सदस्य कोणाच्याही इष्टमित्र परिवारात असतात पण ठाण्याचे विशेष म्हणजे इथे अंतयात्रेला माणसे बोलवावी आणि जमवावी लागत नाहीत, घरचे कोणी गेल्यासारखी दारची माणसेही आपणहून येतात, हि ठाण्याची संस्कृती आहे. इथला रिक्षावाला रस्त्यात वाटेल तिथे, आडवेतिडवे रिक्षा उभी करील पण गाडीत एकट्या बसलेल्या अयाबहीणीला कधी वाटते तिथे, आडवाटेने नेणार नाही, माहेरी पाठराखणीला जाणाऱ्या भावासारखी तिला सुखरूप घरी सोडतील. जुनियर के. जी. तली मुलदेखील आय निर्धास्तपणे रिक्षात बसून सह्लेत एकटी एकटी पाठवताना ठाण्यात दिसतील कारण ठाणेकरांचा ठाणेकरांवर विश्वास आहे आणि हा विश्वास आपण जपायचाच हि ठाणेकरांची निष्टा आहे.
ठाण्यात झोपडपट्टी आहे पण बाकालवस्ती नाही. इथल्या गरिबालाही माणुसकीची श्रीमंती आहे. पण मध्यवर्गीयाला संकुचितपणा इथे नाही. ठाण्याचे रसायन अद्भूत आहे. कुणाला ठाण्याचे वाढलेले, विस्तारलेले महानगरासारखे इथल्या ठाणेकरांचे मनही मोठे होते, विस्तारते आणि नव्याने येणाऱ्याना त्याच आपलेपणाने सामावत चालले आहे.
ठाणे पाहून कुणाला पुणे आठवते. पुण्याच्या संस्कृतीचा चेहेरा ठाण्याला आहे पण पुणेरी-वृत्तीची छाया ठाण्यावर नाही. ठाणे म्हणजे कुणासारखे नाही ते ठाण्यासारखे आहे आणि ठाण्यासारखे दुसरे काही नाही.
ठाणे हेच माझे जीवनगाणे आहे. मी ठाण्याचा आहे आणि ठाणे माझे आहे या पेक्षा माझ्या आयुष्यात आणखी सुखद भावना दुसरी काय असणार ?