मी समाजाला खूप घाबरतो

२७ जानेवारी १९९४ रोजी धर्मवीर आनंद दिघे यांनी ४१ व्या वर्षात प्रवेश केला. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पाक्षीक 'परिसर' ने एक विविध पैलूंनी नटलेली सजलेली मुलाखत पेश करण्याचं ठरवलं होत. जनता जनार्दनासाठी कधीही प्रकाशित न झालेला हा वृत्तांत मुलाखतीद्वारे सादर करीत आहेत. 'परिसर' चे संपादक मधुकर मुळूक.

आनंद दिघे यांची सनसनीखेज मुलाखत

२४ जानेवारीची रात्र. रात्रीचे बारा वाजले होते. टेंभी नाक्याच्या कार्यालयात नेहमीप्रमाणे गर्दी होती. गर्दी आता कमी होईल मग कमी होईल याची मी वाट पाहत होतो. पण अखेर मला न्याय मिळाला. रात्रौ दिड वाजता इतक्या रात्री आनंद दिघेंशी बातचीत करायची म्हणजे त्यांचा मूड आहे कि नाही, रागवतील का, टाळाटाळ करतील का. असे एक ना अनेक घोळ मनात असतानाच दिघे साहेब पुढे सरसावत म्हणाले, या मधुकर मुळूक या “आम्ही पहाटे चार वाजले तरी तुम्हाला उपलब्ध होणार नाही, तरी तुम्ही असे मागे राहू नका पुढे या आज आम्ही तुमच्याशी दिलखुलास बोलणार आहोत” आणि एकदाची मुलाखतीला सुरवात झाली. हास्याचे कारंजे तर कधी गंभीर मधेच भावनोत्कट होऊन केलीली ती चर्चा.

मी मूळ प्रश्नांना सुरवात केली. सोबत बाजूला आमचे स्नेही कैलाश म्हापदी बसले होते. म्हपदिना फक्त श्रोत्याची भूमिका करायची होती. खरा संवाद आम्ही व आनंद दिघे यांच्यातच साधला जाणार होता मी प्रश्न सुरु केले.

प्रश्न : मागे वळून पाहताना आपल्यातला आजचा ‘आनंद दिघे’ कुठे दिसतोय का ?

दिघे : मी भूतकाळाचा विचार फार कमी करतो. वर्तमान व भविष्य यावर माझी जास्त भिस्त असते. तरीही सांगतो, मागे वळून पाहताना मी पंधरा ते वीस वर्षापूर्वी जो आनंद दिघे होतो तोच आजही आहे माझ्यातले नेतृत्वगुण जरी विकसित झाले असले तरी मी नेता कधीच नव्हतो व आजही नाही. हि नेतागिरीची झालर मला नको. मी साधा कार्यकर्ता होतो व आजही आहे. त्यामुळे मागे पाहताना फक्त काळ सरकला, घटना काळाच्या पडद्याआड गेलया व आनंद दिघे मात्र तिथेच आहेत

प्रश्न: कार्यकर्ता किंवा सामाजिक बांधिलकी जपताना कुटुंबाचा नेहमी विरोध असतो. मग इतका मोठा त्याग करताना कुटुंबाची प्रतिक्रिया काय ?

दिघे: कुटुंब म्हणाल तर माझी आई. माझी आई हि सामान्य माणसाची जशी आई असते तशी माझी आहे. तिलाही वाटायचं माझा आनंद खूप शिकवा मोठा व्हावा, लग्न करावं, मुलं नातवंड पाहायला मिळावीत. पण काही या-ना-त्या कारणाने मी संघटनेत अधिक क्रियाशील झालो त्यामुळे कौटुंबिक जिव्हाळ्याचा या प्रश्नाकडे थोडे दुर्लक्ष झाले.

प्रश्न : आपण अविवाहित असल्याचं शल्य आईला सलतं का ?

दिघे : अर्थातच मी अविवाहित आहे. पण, भविष्यात मी लग्नच करणार नाही असं कोणी सांगितलं ? कदाचित करूही शकेन. ती संधी मात्र अद्याप आली नाही.

प्रश्न: का ?

दिघे : मुळात असं आहे. लग्न करणार म्हणजे माझ्या सांसारिक गरजा वाढल्या नववधू येणार म्हणजे घर पाहिजे, भांडीकुंडी पाहिजेत, फ्रीझ, गीझर, टी.व्ही. सगळं आलच. या गरज मी पूर्ण करू शकत नाही. कारण मी कुठलीही नोकरी करत नाही. मग हा व्याप कसा सांभाळणार ? त्यापुढचा प्रश्न म्हणजे मी एक क्रियाशील कार्यकर्ता आहे. लग्न केल्यावर समाजकार्याची जी तीव्रता जपायला हवी ती जपली जाणार नाही. अर्धे लक्ष बायकामुलांकडे लागून राहणार. त्यात माझे बरे वाईट झाले तर पुन्हा त्या निष्पाप स्रीच्या भावनांचं काय ? त्यापेक्षा जोवर उसंत मिळत नाही. तोवर लग्नही करायच नाही.

प्रश्न : थोडं समाज कारणाकडे वळू, आपण शिवसेना हाच पक्ष का स्वीकारला ?

दिघे : १५-२० वर्षापूर्वी माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणांनी व मराठी माणसांच्या कल्याणकारी विचारांनी भारावून गेलो. कॉलेज जीवनापासून शिवसेना हा एकच श्वास मी घेतला व आजही घेत आहे. पुढे जगेन तोवर शिवसेनेतच राहील.

प्रश्न : तुम्ही म्हणता मी पैसे कधीच खात नाही व ती वस्तुस्थिती आहेच. पण तुमच्या नेत्तृत्वाखाली जी पिढी आज नगरसेवक विभाग संघटक, शाखा संघटक म्हणून मिरवतात त्यांनी तर खोऱ्याने पैसा खायला चालू केलाय त्यावर आपलं काय मत ?

दिघे : याला दोन करणे आहेत. एक तर नवीन पोरांनी कधी पैसा पहिला नाही. दुसरं म्हणजे पाच वर्ष मिळालीत ना मग पैसा का खाऊ नये. ही प्रवृत्ती बळावली. त्यापेक्षाही समाज अश्या नाटकी लोकांना फुकटचे महत्व देऊ लागला. पैसे देण केव्हा न देणं त्यांच्या हातात असतं, पण झटपट काम व्हावीत, झटपट प्रसिद्धी मिळावी म्हणून हि थोडी फार पोरकट पोरं भरकटली. पण सगळेच असे नाहीत.

प्रश्न : त्यांना भानावर आणायचे प्रयत्न केलेत काय

दिघे : होय, अशा कार्यकर्त्यांना माझ्याकडे आणा. मी त्यांना थोबाडीत देऊन जाब विचारीन पण जनताही खतपाणी घालते याला मी तरी काय करू ?

प्रश्न: ठाण्याचा शिवसेनेत राजकीय त्रिकोण आहे. आनंद दिघे, सतीश प्रधान, गणेश नाईक, हे परस्पर विरोधी आहेत. त्यांच्यात काहीतरी भांडण आहेत असं लोकांना वाटते ?

दिघे : साफ चुकीचं आहे. सतीश प्रधान, गणेश नाईक व मी, आमच्यात कधीही गैरसमज व भांडणे झाले नाहीत. वादही नाही. थोडा संपर्क कमी होतो तर प्रधान खासदार आहेत. नाईक गटनेते आहेत प्रत्येकाची जबाबदारी प्रत्येकजण पार पाडत आहे. वादाचा मुद्दा येईलच कसा ? आम्ही तिघेही शिवसेनेचे आहोत. शिवसेनेचे विचार बाळासाहेबांचे मार्गदर्शन जर तिघांनाही मान्य असेल तर भांडण होतीलच कशी ? हा वृत्तपत्रांनी उभा केलेला ‘नाठाळ’ वाद आहे. आम्ही तिघेही संघटनेचे कार्यशील तसेच प्रामाणिक व निष्ठावान कार्यकर्ते आहोत हे लक्षात ठेवा.

प्रश्न : आनंद दिघे यांना लोक घाबरतात त्यांच्याकडे भीतीच्या नजरेने पाहतात का ?

दिघे : हा जनतेचा मोठेपणा आहे. पण खरी वस्तूस्थिती वेगळीच आहे ‘मी समाजाला खूप घाबरतो’ प्रथम बाळासाहेबांना घाबरतो व नंतर जनतेला. तुम्हला एक प्रसंग सांगतो. ७ वर्षापूर्वी बियर प्यायलो. ते लोकांना सहज कळलं. दिघे बियर पितात हि कल्पनाच लोकांना सहन झाली नाही. मी क्षणात बियरला वर्ज्य केले. मी समाजाचा खरोखरच आदर करतो.

प्रश्न : लहान मूलं तुमच्यावर खूप प्रेम करतात कारण –

दिघे : खरंय ते. खरोखर लहान मुलं माझ्यावर प्रेम करतात. मी टाडात असताना हीच चिमुकली मुलं ‘दिघे अंकल को छोड दो’ म्हणत मोर्चा काढत होती. मी घाईवरून गेलो होतो.

प्रश्न : तुम्ही निवडणूक लढवत नाही ?

दिघे : मी बाळासाहेबांना मानणारा माणूस आहे जिथे बाळासाहेब साक्षात निवडणुकीपासून अलिप्त आहेत तिथे माझ्या विचारांना तडे जातीलच कसे ? मी कधी निवडणूक लढणार नाही. मी ठाण्याच्या मर्यादित कक्षेत आहे यात खूप समाधानी आहे.

प्रश्न : ‘प्रमुख’ शब्द जाऊन संघटक शब्द आला त्यावर आपलं मत ?

दिघे : उत्तरेत शिवसेनेने निवडणूक लढविली त्यानंतर तिथला प्रत्येक माणूस स्वतःला शिवसेनाप्रमुख समजू लागला. म्हणून प्रमुख शब्द जाऊन संघटक शब्द आला. दुसरं विशेष कारण नाही.

प्रश्न : पत्रकार तुमच्या विरोधात कधी लिहीत नाहीत. याच कारण काय ?

दिघे : त्यांचा मोठेपणाच म्हणायला हवा. पण काही जीवाणू आहेत कि ते वळवळतात. माझी भूमिका स्पष्ट आहे.त्यांनी निःपक्षपातीपणाने लिहावं. कुठेही कोणाला घाबरू नये. निर्धास्तपणे सत्याला सामोरे जावं. कोणाचीच आडकाठी नाही.

प्रश्न : ठाणे झिल्यात किती दौरे काढता ?

दिघे : विशेष नाही. गरज भासली तरच सर्व ठिकाणी जातो. अगदी खेडोपाड्यात रात्री अपरात्री. पण गरजेनुसारच जातो.

प्रश्न : काही शाखा बंद आहेत त्यावर आपली प्रतिक्रिया ?

दिघे : शाखा संघटक बदलून विचार बदलत नाहीत. मनाची खंबीर तयारी असेच निष्ठा वाहायला हव्यात. तरच हि संघटना चालू शकते.खारेगांव, बाळकूम सारख्या ठिकाणी सेने वाढतच नाही त्याला करणार काय ? निष्ठा, प्रेम, सातत्य, संघर्ष हवा, थोडा कमी पडतो. होईल सर्व काही वीयवस्थित आज ना उद्या.

प्रश्न : तरुणांना संदेश

दिघे : त्याग व प्रामाणिकपणा हे दोन गन अंगात असेल तर या विश्वात कुठल्याही संकटाला सामोरे जाऊ शकता. समाजाचा आदर करायला हवा. जर नेत्तृत्व द्यायचा विचार करतो तर समाजाला बरोबर घेऊन चला. अंदाजाच्या मागे स्वतःच्या स्वार्थासाठी जाऊ नका. कोणाचाही अनुनय करू नका. यावर अधिक काय बोलणार.

 


कॉंग्रेसने संसदेची ग्रामपंचायत केली !

लोकसभेचं ठाण्यात सीट शिवसेनेला मिळालं, नव्हे खेचून आणलं. रक्ताचं पाणी करून आनंद दिघे यांनी परिश्रम घेतले. त्याचबरोबर विरोधकांवर जहरी टीका केली ती नेहमीच्या शैलीत. ‘परिसर’ ला मुलाखत देताना प्रकाश परांजपे दीड लाखाच्या वर मताधिक्याने निवडून येतील असं भाकीत करणारे आनंद दिघे परांजपेंना एक लाख ९२ हजार मताधिक्क्याने निवडून आणू शकले. त्यांची हि तंतोतंत खरी ठरलेली मुलाखत.

– फेब्रु. ९६

प्रकाश परांजपे यांच्यासारखा नगरसेवक संसदेत पाठवून संसदेची मुन्सिपालटी करणार काय या विरोधकांच्या टीकेला आनंद दिघे यांनी चोख उत्तर देताना म्हटलंय कि. काँग्रेसने तर संसदेला ग्रापंचायतीचं स्वरूप दिल्या. किमान आम्ही मुन्सीपाल्टीत रूपांतर करू. सुधारणा घडवून आणू. प्रकाश परांजपे हे अभ्यासू तसेच प्रश्नाची जाण असणारा. उत्तम मराठी, हिंदी, आणि इंग्रजी जाणणारा उमेदवार आहे. शिवसेनाप्रमुखांना ४ थी शिकलेली टाळकी संसदेत पाठवायची नाहीत. ते धंदे काँग्रेसचे. या राष्ट्राला सुशिक्षित व सुसंस्कृत बनवायचं असेल तर प्रकाश परांजपे सारखीच माणस संसदेत हवीत म्हणून हा उमेदवार आम्ही दिलाय.

प्रश्न : जिल्ह्यात कसा प्रतिसाद आहे ?

दिघे : यावर दिघे एकदम आत्मविश्वासाने म्हणाले, हा मतदारसंघ खूप मोठा आहे. स्व रामभाऊ म्हाळगी, राम कापसे यांनी मोठ्या कौशल्याने इथलं प्रतिनिधीत्व केलाय. त्यांचीच अपूर्ण राहिलेली कामे प्रकाश परांजपे करतील. शिवाय नव्या प्रश्नांनी बरीच उचल खालली आहे. त्यावर मत करण्यासाठी उपयोजना तयार आहेतच. जाणवलं. यावेळी मतदार प्रचंड आत्मविश्वासाने समोर येताना दिसले. हेच बळ आमच्या पाठीशी आहे.

प्रश्न : कोणते प्रश्न आहेत ?

दिघे : सर्वात मोठा प्रश्न दळणवळण व कारखानदारी यांचा आहे. पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेच सामान्य जनतेचं निर्भय जीवन. देशात भाजपची सत्ता आली तर राज्यातले प्रश्न चुटकीसरशी सुटतील. त्यासाठी प्रकाश परांजपे यांच्यासारखी माणसं आम्ही संसदेत पाठवतोय.

प्रश्न : प्रकाश परांजपेंना फारसं कुणी ओळखत नाही..

दिघे : नरसिंहरावांना ५० वर्षांपूर्वी कोण ओळखत होतं, शरद पवारांना काटेवाडीपलीकडे कोण ओळखत होत; २० वर्षांपूर्वी फारस कोणी ओळखत नव्हतं. परांजपे तर नवीन आहेत. हळूहळू परिचित होतील. मी आहेच कि ! मला तर ह्या जिल्यातला गल्ली-बोळ ओळखतो. मीच दिलेला हा उमेदवार आहे. मग पारांजपेंची नवी ओळख हवीय कशाला ? एकदा खासदार झाले कि फिरताना, प्रश्न जाणून घेताना ओळखत नाही हा मुद्दा गौण आहे.

प्रश्न : भाजपा नाराज आहे…

दिघे : बिलकुल नाही. भाजप नाराज नाही. उलट रामभाऊ कापसे, जग्गनाथ पाटील यांसारखे दिग्ग्ज नेते प्रकाश परांजपेंच्या प्रचाराला कधीच बाहेर पडलेत. नाराजी वैगरे काही नाही. थोडी कुरबुर होती, पण आता प्रश्न मिटला आहे. युतीच्या उमेदवार म्हटल्यावर शिवसेना भाजप खांद्याला खांदा लावूनच प्रचार करणार आहोत. सध्या आम्ही एकत्रच प्रचार करतोय

प्रश्न : तुम्ही आता म्हणालात आमच्याकडे कार्यक्रम आहे….

दिघे : तेच सांगतोय ना ! हा मतदार संघ शहरी आणि आणि ग्रामीण भागात विभागला गेलाय. इथले प्रश्न धसास लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न स. गो. पारवे, स्व. रामभाऊ म्हळगी, राम कापसे यांनी केला. त्यांचाच पाठपुरवठा आम्ही करणार आहोत. दुसरा अत्यंत महत्वचा व तेवढाच जीवाळ्याचा प्रश्न म्हणजे प्रदूषण. कोलशेत, बाळकुम, बेलापूर पट्टी डोंबवली येथील काही रासायनिक कारखाने, मोहने – शहाड या भागातील काही कारखाने मोठया प्रमाणात प्रदूषण करत आहेत. हा प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारित आहे. प्रदुषणविषयक कायदे व त्याही अंमलबजावणी काटेकोरपणे जाहली तरी बहुतांश प्रदूषण संपेल. प्रदूषणाच्या नावाखाली बेकारी नको. तिसरा प्रश्न आहे दुरध्वनी. कल्याण-डोंबिवली-उल्हासनगर भागात मोठ्या प्रमाणात दूरध्वनी ठी थेट देण्याचा प्रयन्त राहील. चौथा प्रश्न आहे तो पाणी प्रश्न शहापूर-मुरबाड भागातून लाखो गॅलन पाणी शहरांना पुरवलं जात. पण तिथला स्थानिक मात्र कोसो दूर जाऊन पाणी आणतो आहे. हि विषमता नाहीशी करणार. उल्हासनगर इथं नोवळी गवानजीकची शेकडो एकर जमीन दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी केंद्र शासनाने ताब्यात घेतली आहे. गेली ५० -६० वर्ष ती जमीन आसूड पडू लागली आहे. त्या जमिनींची मूळ वारसदार शोधून त्यांच्या जमिनी त्यांना परत करण्याची योजना आमच्याकडे आहे. कल्याण – मुरबाड अशी रेल्वे लाईन टाकून दालन-वळणाचा ताण कमी करता येण्यासारखा आहे. असे अनेक प्रश्न प्रकाश परांजपे धसास लावतील असा माझा विश्वास आहे.

प्रश्न किती लीड मिळेल ?

दिघे : अंदाजे दिड लाखाच्या मताधिक्याने प्रकाश परांजपे निवडून येतील असा माझा आत्मविश्वास आहे.

 


उत्कर्षाच्या वाट परिश्रमाने शोधा !

– आनंद दिघे

धकाधकीच्या जीवनात सूर्य उगवतो केव्हा अन् मावळतो केव्हा हे काही समाज कार्यकर्त्यांना ठाऊक नसत. सदैव सेवेचे ध्यास, दुसऱ्यासाठी झिजावं, स्वतःच्या प्रकृतीचही भान न ठेवणारा आणि आपलं कार्यलय चोवीस तास जनसामान्यांसाठी खुलं ठेवणारा शिवसेनेचा धुवाधार नेता गेली २५ वर्ष सार्वजनिक आयुष्यात वावरत आहे. त्यांचं कार्य हाच त्यांचा धर्म ! असे शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांची सर्वस्पर्शी, सर्ववयापी, झिवाळायचं नातं सांगणारी, समाजकारणाची अचूक नस ओळखणारी ही दूरदर्शी विचाराची प्रकट मुलाखत.

प्रश्न : आनंदराव रात्री ३ || वाजलेत तरी इतकी गर्दी कशी ? निवडणूक आल्यात म्हणून की काय ?

आनंदराव : निवडणुकांचं फार्स एक महिन्यांचं असतो. रात्री ३ || नव्हे तर बाराही महिने हे कार्यालय सकाळी ६ || वाजेपर्यंत खुलं असतं.

प्रश्न : मग तुमची निद्रा कधी ? आराम वैगरे करता कि नाही ?

आनंदराव कसली आली आहे झोप आणि कसला आला आहे आराम. आता हेच बघा मीरा- भाईंदरच्या निवडणूका पार पडल्या. नुकताच पोहचलो गर्दी पाहतो तो नेहमीप्रमाणे. लोकांना टाळता येत नाही अडचणी असतात त्या सोवण्यालाच पाहिजेत एखाद् दुसरा तास झोप घोट कधी कधी प्रवासटाच डोकं टेकतो

प्रश्न : पण अशा धकाधकीतुन तुम्ही दोनदा आजारी होता…

आनंदराव : कबुल आहे. ईश्वर सत्तेपुढे नाईलाज आहे. आमच्या मातोश्री स्व. निर्मलादेवी दिघे नेहमी म्हणायच्या जो दुसऱ्यासाठी झिजतो त्याच्या मागे परमेश्वर असतो.

प्रश्न : आनंदराव, आपण थोडे तुमच्या आजूबाजूच्या वादळांकडे वळू या. सध्या वृत्तपत्रीय बातम्या विशेषतः सायं दैनिक आपल्याला टार्गेट करण्याचा प्रयत्नात आहेत. आपलं मत काय ?

आनंदराव : मी अश्या बातम्या निव्वळ टाइमपास म्हणून वाचतो. संध्याकाळची बातमी निव्वळ करमणूक करते एवढं नक्की.

प्रश्न : तरीही शिवसेनेत विशेषतः ठाणे जिलाह्यात गटगटाचे राजकारण चालतं हे आपल्याला मान्य आहे का ?

आनंदराव : मला मान्य नाही. राजकारणापेक्षा समाजकारणाकडे माझा अधिक कल असतो. त्यामुळे गट – तट मी मानायला तयार नाही.

प्रश्न : बाळासाहेब तुमच्यावर अगदी आंधळा विश्वास ठेवतात. गमक काय ?

आनंदराव : आनंद दिघे यांनी आयुष्यात स्वतःसाठी काहीच केल नाही. सदैव दुसऱ्यासाठी झिजले आहे हे बाळासाहेबांना पुरेपूर ठाऊक असल्यानेच बाळासाहेब तसा विश्वास ठेवत असावेत. त्यापुढे जाऊन मी म्हणेन, बाळासाहेबांनी आजवर टाकलेला विश्वास मी सार्थ केला आहे त्याला कुठे तडा जाऊ दिला नाही.

प्रश्न : मुंबईत बाळासाहेब ‘समांतर सत्ता केंद्र’ तर ठाणे आनंद दिघे ‘समांतर न्यायालय’ चालवतात अशी एक टीका होते…

आनंदराव : बाळासाहेबांबद्दल मी काय बोलावं ? ती व्यक्तीच इतकी महान आहे की त्यांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेणं चुकीचं ठरेल. मी ‘समांतर न्यायालय’ चालवतो हे मी वृत्तपत्रामधून वाचलं होतं. ती पुष्प भावे, वाचाळ खैरनार मंडळी अशी ओरड करताआहे हे माझ्याही कानावर आलंय. या प्रश्नाचं सविस्तर उत्तर एवढच देईन की, ज्याच्यासाठी हे ‘कथित’ समांतर न्यायालय चालत त्यांची कोणाची तक्रार आहे ? तंटे – बखेडे परस्पर सामंजस्याने एकत्र बसवून जर मिटविले जात असेल आणि कौटुंबिक विनाशापासून त्यांना वाचवलं जात असेल तर ते अयोग्य कसे ? शिवसेनेचा जिल्हाप्रमुख या नात्याने लोक आपल्या समस्या घेऊन येतात त्या समस्यांचं निराकरण होऊन हि मंडळी आनंदाने परतत असेल तर त्याला समांतर ‘न्यायालय कसे म्हणता ? बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्या कार्यपद्धतीला ‘मिड डे’ ह्या इंग्रजी वृत्तपत्रातून चोख उत्तरदिले आहे. त्यामुळे जे टीका करतात त्याचे दात आपोआप घश्यात गेले आहेत. मी त्यावर आणखी काय बोलणार ?

प्रश्न : आनंदराव, ठाण्यात तुमच्याच पक्षाची सत्ता तुंम्हीच त्या सत्तेचं वाभाडं काढत असतात हे कितपत बरोबर आहे ?

आनंदराव : हि शिकवण शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांची, चुकीच्या दिशेने मार्गक्रमण करत असेल तर भले तो आपल्या पक्षाचा असेल तर त्याला त्याची जागा दाखवून द्यायला हवी. मला भ्रष्टाचार, वेळकाढूपणा आणि अकार्यक्षम कारभाराची चीड आहे म्हणूनच कदाचित मी मागे डाफरलं असेल.

प्रश्न : ४१ % प्रकरण पूर्ण मिटलं ?

आनंदराव : माझ्या माहितीप्रमाणे नक्कीच ! अधिकारी नगरसेवकांना आपण जनतेचे नोकर आहोत हे जोवर पटत नाही, तोवर स्वच्छ प्रशासन आणि सचोटीचा नगरसेवक मिळणं आवश्य. येत्या निवडणुकीत मला स्वच्छ चारीत्र्याचे आणि जनतेशी आपलं नातं सांगणारेच उमेदवार द्यायचेत. येणार काळच ह्या प्रश्नांच चांगलं उत्तर देईल.

प्रश्न : भ्रष्टाचाराचा मुद्दा निघाला म्हणून विचारतो, अण्णा हजारे ठा. म. पा. च्या, भ्रष्टाचारावर रान उठवणार आहेत तर तुमच्याही कार्यालयासमोर सभा घेणार असल्याचं वाचलं. हे कितपत खरे ?

आनंदराव : अण्णांना भ्रष्टाचाराची चीड आहे तशी मलाही आहे. ती नसती तर मी आपल्यलाच सत्तेतील पालिकेला वेठीस धरले नसते. अण्णांच कार्य महान आहे. मी त्यांना बराच वेळा भेटलो आहे. तासंतास चर्चाही केलीय. मी करत असलेले कार्य, सामाजिक, उपक्रम आणि अनेकदा कौतुक स्वतः अण्णांनी प्रत्यक्ष भेटीत केले आहे.

प्रश्न : मग ते इतकी कठोर घोषणा कशी काय करू शकले ?

आनंदराव : अण्णा माझ्या कार्यालयासमोर कधीच सभा घेणार नाहीत. त्यांचा आजून खैरनार झालेला नाही. जरी सभा घेतली तर त्यांच्याकडे माझ्याविरुद्ध बोलण्यासारखं काय आहे ? मला ना स्वार्थ, ना माझी कुठं प्रॉपर्टी, ना बँक बॅलन्स, ना संसार, ना आलिशान बांगला. कशावर बोलणार ? आणि जर बोलले तर प्रेक्षकांच्या पहिल्या रांगेत मी बसेन आणि त्यांचे भाषण ऐकेन.

प्रश्न : स्थानिक राजकारणात तुमचे मित्र वसंतराव डावखरे व आपण संगनमताने ह्या शहराची दिशा ठरवता हे कितपत योग्य आहे ?

आनंदराव : साफ चुकीचं आहे. डावखरे यांची पक्षनिष्ठा आजही कायम आहे. आमची मैत्री आहे कबुल पण पक्षीय राजकारणात मैत्रीचा संबंध आम्ही कधीच येऊ देत नाही. मैत्री हा आमचा वैयक्तिक जीवनाचा भाग झाला.ह्या शहराला दिशा देण्यासाठी चांगले कार्यक्रम देणारा पक्ष जरुरीचं असतो. सुदैवाने शिवसेनेला ठाण्यात प्रचंड लोकप्रियता लाभली.

प्रश्न : किती विद्यमान नगरसेवकांना वगळणार ?

आनंदराव : प्रभागाची फेररचना व आरक्षण यामुळे काही विद्यमान नगरसेवक आपोपच वगळले जाणार आहेत.

प्रश्न : जीवनात अश्रू ढाळण्याचे प्रसंग कधी आले ?

आनंदराव : स्व. माँसाहेब मीनाताई ठाकरे व आमच्या मातोश्री स्व. निर्मलादेवी दिघे यांच आकस्मित जाणं मला धक्का देऊन गेलं. जीवनात त्याचवेळी अश्रू घळघळले.

प्रश्न : अत्यानंदाचा क्षण…

आनंदराव : गरजू, अडलेल्या, नडलेला गरीब माझ्याकडे जेव्हा मोठ्या अपेक्षेने काम घेऊन येतो त्यावेळी त्याचे काम माझ्या हातून झाले आणि तो उल्हसित, आनंदित घरी परततो तो क्षण माझ्या अत्यानंदाचा असतो. असे लाखो क्षण माझ्या हृदयाच्या गाभाऱ्यात साठवले आहेत.

प्रश्न : वाढदिवसानिमित्त शुभेच्छा काय द्याल ?

आनंदराव : समस्त जनांना सुखी – आनंदी व आरोग्यदायी जीवन लाभो. उत्कर्षाच्या वाटा परिश्रमाने शोध. सतत दुसऱ्याच्या कामी या एवढच सांगेन.